परमपूज्य संत श्री विनायक भाऊ महाराज: परिचय

श्री विनायक भाऊ महाराज यांचे जीवन भक्ती, सेवा व समाजकार्य या तिन्ही गुणांनी भरलेले आहे. त्यांनी त्यांच्या हयातीतच भक्तांच्या देणगीतून लासुरा फाटा येथे आश्रमाचे मुळ पावले रोवले व अनेक लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले.

आश्रम स्थापन व विकास

भक्तगणांच्या देणगीतून साधारण 10–12 वर्षांपूर्वी आश्रमासाठी जमीन घेतली. विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन ती खरेदी केली गेली. आश्रम परिसरात तार कंपाऊंड, मोठा हॉल, दोन खोली आणि आवश्यक पाणी व्यवस्था उभी केली गेली.

मंदिरे व धार्मिक कामे

गुरुमाऊलींच्या आज्ञेने येथे तीन प्रमुख मंदिरे उभारली गेली — महादेव शिवलिंग, महा कालिका माता व हनुमान मंदिर. मंदिरांच्या बांधकामासाठी भक्तांच्या देणगीमुळे व साहित्यांच्या मदतीमुळे काम सुरु झाले व 6 जून 2021 रोजी विशेष विधीने बांधकामाची सुरुवात करण्यात आली.

नोंदणी व न्यास

19 जुलै 2021 रोजी आश्रम अधिकृतपणे ‘संत कृपा शांती आश्रम न्यास’ म्हणून नोंदणीकृत करण्यात आला (प. ट्र. रजि. नं. 968 – बुलढाणा). न्यासासाठी 9 सदस्यीय विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली व ट्रस्ट डीड तयार केला गेला.

परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांचे गादी घर

याच गादी घरामध्ये भाऊंनी वास्तव्य केले असून श्री हनुमंताची ध्यानधारणा सुद्धा येथेच केली आहे. त्यामुळे सदर आश्रमाचे परिसरात आल्यानंतर प्रत्येक भक्तगणांना आध्यात्मिक शांती लाभते त्याचा अनुभव प्रत्येक भक्तगणांना येत आहे.

परमपूज्य श्री सद्गुरु विनायक भाऊ महाराज हे श्री संत मुक्ताबाई तसेच श्री संत सखाराम बाबा इलोरा संस्थेचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी माघ शुद्ध वसंत पंचमीला ते ईलोरा (सखारामपूर), तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथे वारी करीत असत.

ईलोरा (सखारामपूर) येथे हरिभक्त परायण गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर यांचीही समाधी आहे. गुरुवर्य श्रीराम महाराज यांचे अध्यात्मिक गुरु श्रीनाथ बाबा हसनापूर हे होते, तसेच परमपूज्य श्री सद्गुरु विनायक भाऊ महाराज यांचेही अध्यात्मिक गुरु श्रीनाथ बाबा हसनापूर हेच होते. त्यामुळे गुरुवर्य श्रीराम महाराज आणि परमपूज्य श्री सद्गुरु विनायक भाऊ महाराज हे गुरुबंधू होते.

परमपूज्य श्री सद्गुरु विनायक भाऊ महाराज आणि गुरुवर्य श्रीराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला.

मानवाला माणसासारखे वागण्याची आणि वागवण्याची शिकवण त्यांनी अध्यात्मिक उपदेशांद्वारे दिली. त्यामुळे त्यांच्या उपदेशांचा प्रभाव आजही अनेकांच्या जीवनात आध्यात्मिक जागृती निर्माण करतो.

श्री संत भोजने महाराज
गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर
श्री संत ठाकरे महाराज
श्री संत सखाराम महाराज